Skip to content

फॅन्सी ड्रेसमधील अपार्थाईड

भारतातील अरेंज मॅरेजच्या व्यवस्थेविरोधात
English  |  हिन्दी  |  தமிழ்  |  తెలుగు  |  मराठी

Translated into the Marathi by Pranali Yengde.

भारतीय सिनेमाचे प्रेमावर अतिशय प्रेम आहे. त्यामध्ये ज्याप्रमाणे गरीब-श्रीमंत यांच्यातील प्रेम, धर्म, सीमा आणि भाषा यांना लांघून केललं प्रेम यांचा उत्सव केला जातो, त्याचप्रमाणे त्यात लिंग आणि लैंगिकता या प्रेमाच्या साचेबध्द मानकांना छेद देऊन मागे उरलेल्या प्रेमालाही साजरं केलं जातं. अशा सिनेमाचा परदेशी प्रेक्षक भारत हा प्रेमास पूरक समाज आहे, असा निष्कर्ष सहजपणे काढू शकतो. परंतु सत्य याहून फार वेगळे आहे. बॉलीवूड ज्यावर उघडपणे चर्चा करत नाही ती जात हे असे कटू सामाजिक वास्तव आहे जे भारतातील सर्व रोमँटिक आणि वैवाहिक नात्यांच्या मूळाशी अस्वस्थपणे बसलेले असते.

उदाहरणार्थ बॉलीवूडची प्रसिध्द शैली असलेला “कौटुंबिक सिनेमा” हा पैसे राखून असणाऱ्या मध्यमवर्गाचा असतो. त्याचा प्रेक्षकवर्ग मात्र अधिक व्यापक आहे. मी आमच्या शेजार्‍यांकडे सिनेमा बघत असे, कारण केबल कनेक्शन आम्हाला परवडणारे नव्हते आणि आमचा कृष्णधवल दूरचित्रवाणी संच पुरेसं मनोरंजन करण्यास असमर्थ होता. तीन तास चालणारे हे चित्रपट सहसा लग्नापाशी येऊन थांबतात. पण तिथे पोहोचण्यापूर्वी प्रेक्षकांची वेगवेगळ्या पात्रांशी ओळख होते. सामान्यत: ही पात्र रोमँटिक जोडप्याच्या विस्तारित परिवारातील असतात. मग असे दिसते की सिनेमाच्या कथेत एकानंतर एक उपकथानकं येतात. प्रत्येक कुटुंबाच्या व्यवसायासंदर्भातील वारसा हक्कावरून सुरू असलेल्या कुरबुरी, कावेबाज मोठा भाऊ, हिंदू सण साजरे करणे (बहुतेकवेळी संगीतासह)—ज्यामुळे फुलत जाणार्‍या रोमान्सला धोका निर्माण होतो किंवा मदतही होऊ शकते. शेवटी अपरिहार्यपणे वधू आणि वराचं मिलन होतं.

वरकरणी हे सर्व आलबेल दिसते. परंतु सुक्ष्मपणे पहा आणि तुमच्या लक्षात येईल की विस्तारित कुटुंबाची उपकथानकं ही अशी माध्यमं आहेत ज्यायोगे हा चित्रपट अरेंज मॅरेजचे समर्थन करतो या वस्तुस्थितीला झाकले जाऊ शकते किंवा कमीत कमी तिची तीव्रता कमी केली जाऊ शकते! भारताबाहेरील प्रेक्षक मग असे समजू लागतात की अरेंज मॅरेजेस ही भारतीय परंपरा आहे, ज्यात तरूण लोक स्वेच्छेने त्यांच्याकरता योग्य ‘जोडीदार’ शोधणार्‍या आपल्या पालक आणि इतर वरिष्ठ मंडळींच्या मर्जीला शरण जातात. काहीजण तर याचा संबध उच्च आदर्शांशी जोडतात. हा केवळ एक भ्रम आहे. खरेतर अरेंज मॅरेज हे जातीय विवाह आहेत. म्हणजे, ते एकाच पोटजातीच्या दोन व्यक्तींमधील असे विवाह असतात, जे कुटुंबीय रक्षकांनी– पालक, वडील, काका, काकू आणि दूरचे नातेवाईक- यांनी घडवून आणलेले असतात. यातून ते हे सुनिश्चित करू इच्छितात की त्यांच्या वंशाचे रक्त कुठल्याही खालच्या जातींमुळे दूषित होऊ नये.

असे शुद्धीकरण करवून घेतलेले कौटुंबिक चित्रपट एका कारणास्तव अस्तित्त्वात आहेतः भारतातील उच्च जाती, किंवा तथाकथित “द्विज” हिंदू लोक—जे लोकसंख्येच्या जवळजवळ अठरा टक्के आहेत—ज्यांनी आपल्या संकुचित, उच्चभ्रू, भपकेबाज जातीसंस्कृतीला पुढे करत बॉलीवूडवर साम्राज्य गाजवून अखंड भारतीय समाजजीवनाचे व्यंगचित्रात्मक प्रतिनिधित्व केले आहे. (वस्तुतः त्यात पंजाबी खत्री जातीचे विवाह भारतीय विवाहाची संस्कृती म्हणून सादर केले जातात.) खानपान, कपडे, त्यांच्या फॅन्सी घरांमधील सजावट, साड्या, कुंकू (कपाळावरील सिंदूर), सणवार आणि ते जे देव पुजतात ते सारं काही उच्च जातींच्या भावविश्वात सामावणारे आहे. बॉलीवूड अनेकदा दलित (पूर्वास्पृश्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या जाती), आदिवासी (येथील मूळ लोक), आणि एकूण भारतीय लोकसंख्येच्या सत्तर टक्के प्रमाण असणार्‍या मागासवर्गीय हिंदूंचे अस्तित्व नाकारताना दिसते. भिन्नतेची संस्कृती अशा नाशकारक स्थितीला बळकट करते ज्यामध्ये “द्विज” जातीचे सदस्य आपल्या कुलीनतेचा फायदा करून घेत त्यांच्या जातीनिहाय गटात, अंतर्विवाह करून, त्यांच्या मुलांना विशेषतः मुलींना आपल्या नियंत्रणात ठेवतात. पण ज्या आधारावर असे विवाह टिकून आहेत त्या संरचनात्मक हिंसेला मात्र झाकले जाते.

सर्वात वाईट गोष्ट म्हणजे बॉलिवूड जेव्हा हिरो हिरॉईनच्या प्रेमाची कथा सांगते मात्र  नायक नायिकेच्या कौटुंबिक वा सामाजिक परिस्थितीची माडंणी करण्याचे टाळते. प्रत्यक्षात भिन्न जातीय तरूण तरूणी लग्न करायचं ठरवतात तेव्हा लागोलाग येणारी हिंसा तर येते. पण बॉलिवूड आपला जातआंधळेपणा सतत दाखवून दिल्याचे बघायला मिळेल. पण खर्‍या आयुष्यात प्रेमविवाह करणार्‍यांपुढे मोठी आव्हानं असतात, विशेषतः प्रेमविवाह जर जातीच्या परिक्षेत्राला ओलांडून झालेले असतील.

बॉलिवूडच्या कल्पनारम्य जगाच्या अगदी तीव्र विरोधाभासामध्ये हे सर्वात भयानक सत्य आहे की आजही आंतरजातीय संबंध संपूर्ण ग्रामीण भारतात जिम क्रो शैलीतील दंगल आणि प्राणघातक हल्ले घडवून आणू शकतात. (माध्यमांत, याचे वर्णन “ऑनर किलिंग” असे केले जाते.) बहुतेक वेळा जात संरचनेच्या खालच्या स्तरातील व्यक्तीचा स्वभिमान ठेचला जातो तर कधी उच्च जातीच्या कुटुंबाकडून त्याला ठारही मारले जाऊ शकते. मी हे लिहित असताना, माझ्या फीडमध्ये एका बातमीचा मथळा पॉप अप होतो आहे. त्यात असं लिहिलंय: “दलित माणसाच्या प्रेमात असलेल्या बाईचा तिच्या आई-वडिल आणि भावाकडून खून.” दलित माणसाशी संबंध असल्याबद्दल तिला तिच्याच कुटुंबाने गळा आवळून मारून टाकले. तपास अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार, “भारतीची आई रश्मी तिच्या छातीवर बसली आणि उशीने तिचं तोंड दाबून टाकले, तर मनीषने तिचे हात पकडून ठेवले. तिचा मृत्यू झाल्यानंतर तिची आत्महत्या झाल्याचे दाखवण्यासाठी तिच्या वडिलांनी आणि भावाने तिच्या खोलीच्या छताला तिचा मृतदेह लटकविला. आपला वंश अपवित्र होऊ नये म्हणून पोटच्या पोरीचा खून करायला आई वडील मागेपुढे बघत नाहीत. दलितांचा द्रव अख्या जाती संस्थेला धोका निर्माण करतो.

आपला वंश शुद्ध ठेवण्यासाठी अशा प्रकारची रानटी कृत्ये निर्लज्जपणे चालू राहतात म्हणून या “पारंपरिक” अरेंज मॅरेजेसशी संबंधित तथाकथित सद्गुणांचा किंवा बॉलीवूडने अंधारात ठेवलेल्या गोष्टींचा आपल्याला पुनर्विचार करायला हवा. तुम्ही काहीही म्हणा पण, अरेंज मॅरेजेसचे आकलन केल्याशिवाय कोणालाही भारतीय समाज समजू शकत नाही, असे विवाह दुर्दैवाने सर्व स्तरात प्रचलित आहेत . ताज ग्रुप ऑफ होटल्सने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की पंच्याहत्तर टक्के तरुणांनी अरेंज मॅरेजला अनुकूलता दर्शविली आहे आणि उत्तर भारतातील 82 टक्के महिलांनी त्यांच्या पालकांनी त्यांच्यासाठी जोडीदार शोधण्यास पसंती दिली. कोणत्या प्रकारचे वैवाहिक आयुष्य या कोट्यवधी अभागींच्या नशिबात आहे? त्यांच्या पालकांनी हा काय छळ त्यांच्या आयुष्यात मांडून ठेवलाय?

प्रेमाचा बाजार

अरेंज मॅरेजेस वेगवेगळ्या प्रकारे लावले जातात. सर्वात प्रचलित प्रकार म्हणजे, कुटुंबातील वडीलधारे किंवा जातीचे (साधारणपणे “जाती गट”/“जातसमुदाय”) किंवा एखाद्या सांस्कृतिक किंवा धार्मिक संघटनेद्वारे सोयरिक केली जाते. बहुतेकदा, दोन्ही जोडीदारांची कुंडली तपासून नातेसंबंध योग्य प्रकारे चालतील की नाही याविषयी पाहणी केली जाते. न जुळणार्‍या कुंडलींमुळे बरीच ह्रदये मोडली आहेत. अंधश्रध्दाळू समाजाची ही कृपा आहे. जर तुमचे कौटुंबिक सगेसोयरे तुम्हाला योग्य जोडीदार मिळवून देऊ शकले नाही तर चॅटलसारख्या (मालमत्ता) वधू-वर परिचय मेळाव्यांची सोय देखिल असते. (ही गोष्ट अलीकडेच युन शेंगच्या लंडन रिव्यू ऑफ बुक्समध्ये वर्णन केलेल्या चिनी “विवाह बाजारपेठे” च्या गोष्टींपेक्षा वेगळी नाही.)

परंतु अशा प्रकारची “पारंपरिक” माध्यमं ज्यातून विवाहांचे आयोजन केले जाते ती आधुनिक पद्धतींच्या तुलनेत नगण्य आहेत. कोणतेही भारतीय वृत्तपत्र उघडा, आपणास एक किंवा दोन पान “वैवाहिक” जाहिरातींसाठी राखीव असलेले आढळेल. ते पान जातीच्या धर्तीवर छोट्या बॉक्समध्ये निर्लज्जपणे, विभागलेले असते जेणेकरून तुम्ही तुमच्याच जातीतील विवाहेच्छूक स्त्री-पुरूष शोधू शकाल आणि अशुद्धीच्या सकंटापासून स्वतःला वाचवू शकाल.

मध्ययुगीन पूर्वग्रह आणि जागतिकीकरणातील भांडवलाच्या अपवित्र युतीचे प्रतिनिधित्व करणारी मॅच मेकिंगची(सोयरिक) व्यवस्था ही भारतातील मोठी बाजारपेठ आहे.

अशा दोषांवर मात करण्यासाठी, भारतातील सर्वात मोठे इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडिया, जातीचा उल्लेख न करणार्‍या आणि जाती-आधारित निवड न करू इच्छिणा-या वैवाहिक जाहिरातींवर पंचवीस टक्के सूट देते. त्यांनी आंतरजातीय संबंधांना प्रोत्साहित करण्यासाठी “जातीची अट नाही” हा स्वतंत्र विभागही तयार केला आहे. परंतु उच्चवर्णीय भारतीयांनी तिथेसुध्दा पळवाटा शोधून काढल्या आहेत. “जातीची अट नाही” विभागात काहीजण चोरून त्यांच्या स्वत:च्या जातीचा उल्लेख करतात हा त्यांच्या उच्चजातीबांधवांसाठी दिलेला संकेत असतो. जातीची अट नाही विभागातील एका निर्लज्ज अर्जदाराने “फक्त उच्च जाती” असेही टाकले (हा विरोधाभास बहुधा “द्विज” किंवा उच्चवर्गीयांमध्ये असंख्य जाती आहेत, ही वस्तुस्थिती स्पष्ट करते.) एखादा अर्जदार “एससी / एसटीशिवाय कुठल्याही जातीचा अडसर नाही” असं पोस्ट करतो तेव्हा या प्रकारचा भेदभाव उघडपणे ओंगळ दिसू लागतो. (एससी म्हणजे “अनुसूचित जाती,” म्हणजे पूर्वीच्या खालच्या जातीतील सदस्यांसाठी असलेली संज्ञा आणि एसटी म्हणजे “अनुसूचित आदिवासी जमाती.”)

अरेंज मॅरेजेस निश्चित करण्यास मदत करण्यासाठी आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स देखील तैनात करण्यात आले आहे. वैवाहिक संकेतस्थळांचा अलिकडच्या वर्षांत प्रसार झाला आहे. त्यापैकी सर्वात लोकप्रिय साईट भारत मॅट्रिमोनी आणि शादी डॉट कॉम—नातेसंबंध, जाती आणि वंशाच्या नाजूक जाळयांना अबाधीत राखण्यासाठी आधुनिक गाळणीसुद्धा त्यात पुरवली जाते.

निमशहरी भागांमध्ये जातीचे उल्लंघन करण्यासाठी लागणारी गुप्तता ही संकेतस्थळे पुरवू शकतात. पण त्या ऐवजी या संस्था रानटी वैदीक धारणांचा पुरस्कार करणा-या संस्था झाल्या आहेत. जणू काही त्यांचे आधीचे पूर्वग्रह पुरेसे नव्हते म्हणून आता अनेक वैवाहिक संकेतस्थळं आली आहेत जी आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था) आणि आयआयएम (भारतीय व्यवस्थापन संस्था) सारख्या उच्चशिक्षण शाखांच्या पदवीधरांसाठी पूर्णपणे वाहिलेली आहेत. जात आणि वर्गाचं सातत्य टिकवण्यासाठी त्यांची टॅगलाईन आहे “अल्मा मॅटर मॅटर्स.”  एकुणच, जुळवलेली लग्न ही मध्ययुगीन पूर्वग्रह आणि जागतिकीकरणातील भांडवलशाहीच्या अभद्र युतीचे प्रतिनिधित्व करणारी भारतातील एक मोठी बाजारपेठ आहे. (एआय – आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आता कुटुंब समुहाचे प्रमुख बनले आहेत.) अलीकडेच इकॉनॉमिस्टने नोंदवले आहे की भारतात अरेंज मॅरेजसच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल ५० अब्ज डॉलर्स एवढी आहे. आणि कोणत्याही वेळी ६३ दशलक्ष अविवाहित सक्रियपणे या वेबसाईट्सवर जणू काही दुःखी भवितव्य शोधत असतात.

तथापि ही प्रतिगामी पद्धत केवळ मायदेशापुरती मर्यादित नाही. बरेच परदेश-स्थित भारतीय व्यावसायिक अल्प कालावधीत शक्य तेवढे पर्याय शोधण्यासाठी भारतात येतात आणि संभाव्य वधू किंवा वरासह परत माघारी जातात. (न्यू जर्सीच्या रहिवाशांनो, तुम्ही नक्कीच काही जणांना भेटला असाल!) अमेरिकेत आयटी प्रोफेशनल म्हणून काम करणारा एक मित्र, ऑनलाईन सापडलेल्या किंवा त्याच्या कुटुंबियांनी शोधलेल्या स्थळाला भेटण्यासाठी दर सहा महिन्यांनी भारतात परततो. ही शोधयात्रा संपण्यासाठी तीन वर्षे लागली. तसे होण्याचे एक कारण म्हणजे त्याचे वय. तो त्याच्या पस्तिशीत होता आणि त्याला अपेक्षित असलेला जोडीदार मिळण्याच्या आग्रहामुळे त्याला इतका काळ थांबावं लागलं होत. पण यात शंका नाही की त्याच्या दुराग्रही पालकांना आपला मुलगा समलिंगी नाही याचा आनंद झाला होता.

अरेंज मॅरेजचा जुलूम स्त्रियांना अधिक भोगावा लागतो, हे काही वेगळं सांगायला नको. अरेंज मॅरेजच्या अर्थकारणात, मुलीला “परके धन” मानले जाते, ही एक अशी संकल्पना आहे जिच्यामध्ये मुलगी योग्य वेळी जिथे खर्या अर्थाने तिचे अस्तित्व असावे अशी धारणा आहे, अशा भावी वराच्या कुटुंबाकडे सोपावता येण्याजोगी केवळ एक कर्ज किंवा गुंतवणूक असते. भारतीय विकास मानवी सर्वेक्षणात असे आढळले आहे की भारतातील केवळ 5 टक्के नववधूंनी सक्रियपणे स्वतः नवरे निवडले होते. केवळ 55 टक्के परिवारांनी सोयरिक निश्चित करण्यापूर्वी आपल्या मुलीचे मत विचारात घेतले होते; लग्नदिवशी किंवा त्या आसपास 65 टक्के नववधू आपल्या नवर्याशी प्रत्यक्षात भेटल्या किंवा त्याच्याशी परिचित होत्या; आणि भीषण म्हणजे लग्नाआधी कमीतकमी महिनाभर ज्यांना आपल्या जोडीदाराची ओळख होती त्या फक्त 15 टक्के होत्या. तसेच, सर्वेक्षण केलेल्या 62 टक्के शिक्षित महिलांनी असे म्हटले आहे की त्यांनी लग्नाआधी आपल्या जोडीदाराशी कुठलाही संपर्क साधला नव्हता. थोडक्यात, अरेंज मॅरेजचे सेक्शुयालिटी आणि इच्छांवर परिपूर्ण नियंत्रण दिसून येते. पूर्व-निर्णायक जीवन कसे जगावे याचे तरूणांसाठी असलेले ते मॅन्युअल आहे, असे परिक्षेत्र ज्यामुळे तरुणांना अज्ञातामध्ये भटकण्यापासून रोखले जाते.

मग हे न्याय्य कसे? जेव्हा तुम्ही वडीलधाऱ्यांना विचारता की त्यांना आपल्या मुलांसाठी जोडीदार शोधण्यास इतके कष्ट का पडतात तेव्हा ते सावरासावर करून उत्तर देतात. बरेचजण असे म्हणतील की एकाच “जाती संस्कृती” मध्ये लग्न करणे सोपे असते: सवयी, भोजन, संस्कार आणि धर्म जुळतात आणि म्हणून ते एखाद्या अनोळखी व्यक्तीशी का होईना तसे करणे सोपे पडते. (इथे अनोळखी म्हणजे जिथे मुलीला उजवून दिले जाते.) काही लोक तर असंही म्हणतील की एकाच जातीने जोडले गेलेले संबंध दोन्हीही परिवारातील सदस्यांमध्ये सलोख्याचे बंध निर्माण करतात. आपण काहीही तर्क लावला तरी हे मात्र निश्चितपणे खरे आहे की अरेंज मॅरेज दोन व्यक्तींमधील नसून संपूर्ण कुटूंबातील बंध आहेत.

तथापि, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की भारतातील 95 टक्के जोडपे लग्नानंतर त्यांचे पालक आणि इतर विस्तारित कुटुंबाबरोबर राहतात. तर 70 टक्के जवळजवळ दहा किंवा अधिक वर्षे परिवारासह राहतात. यामुळे असे वातावरण तयार होते की आपले छोटे मोठे निर्णय जसे की (तुम्हाला कधी मुलं हवी, किती हवी) इत्यादींवर परिवाराचा गहिरा प्रभाव पडतो. या दृष्टिकोनातून पाहिल्यास कौटुंबिक अर्थव्यवस्थेचा लग्न हा नाममात्र हिस्सा आहे. जातिधारित अरेंज मॅरेजेस समाज आणि आपला परिवार यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचा मार्ग आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरेचा भार मात्र तरुण पिढीला झेलावा लागतो.

मानवी श्रेणीकरण

आतापर्यंत आपण बऱ्यापैकी घाबरला असाल. अध्यात्म, हत्ती, रंगीबेरंगी कपडे इत्यांदिशी जोडलेल्या भारत देशात विवाहाचे असे निश्चितपणे श्रेणीबद्ध, सारंजमशाही रूप आहे हे कसे शक्य आहे? सुरवातीला भारत जिथे आहे तिथे कसा पोहोचला हे जाणून घेण्यासाठी आपणास जातिव्यवस्थेविषयी जाणून घेतले पाहिजे, ही एक मूलभूत सामाजिक व्यवस्था आहे जिच्या आधारावर एक दिशाहीन देश उभा आहे.

जातीचे मूळ प्रामुख्याने शास्त्रीय हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये आढळते. भगवद्गगीतेमध्ये ईश्वर घोषित करतो की तो स्वत: चतुर्वर्ण व्यवस्थेचा उद्गाता आहे- अशी व्यवस्था जी समाजाला चार ठळक जातींमध्ये विभागते , “ब्राह्मण” (किंवा मुख्य याजक), “क्षत्रिय” (सैनिक आणि योद्धा), “वैश्य” म्हणजे “बनिया” (व्यापारी) आणि “शूद्र” (शेतकरी किंवा हातमजूर). या विस्तृत श्रेणींबरोबरच, हजारो “जाती” किंवा समुदाय आहेत, जे प्रत्येकी विशिष्ट व्यवसायाशी (मच्छीमार, माळी, शिक्षक इत्यांदीशी) संबंधित आहेत. याबरोबरच काही “अस्पृश्य” जाती देखिल होत्या त्यात विविध जाती आणि उपजातींचा मिळून एक जाती समुह बनत असे, ज्यांना पारंपारिकरित्या जबरदस्तीने अतिशय हलक्या दर्जाच्या कामात गुंतवले गेले आणि जाती श्रेणीच्या बाहेरचे नाममात्र मानले गेले.

अरेंज मॅरेजची व्यवस्था सेक्शुयालिटी, इच्छा, आणि विकल्प यांच्यावरील परिपूर्ण नियंत्रणाचे प्रतीक आहे. तरुणांनी पूर्वनिर्धारित आयुष्य कसे जगावे याचे ते एक मॅन्युअल आहे.

जाती जिथे वर्गाशी जुळते तिथे श्रमांची एक क्रूर विभागणी केली जाते आणि उपेक्षित वर्गाच्या असहायतेवर वार केले जातात. कठोरपणे आर्थिक उत्पादनावर अंकुश ठेवून “द्विज जाती”—ब्राह्मण, क्षत्रिय आणि बन्या जुलमीने उत्पादक शाखांवर सक्त आराखड्यात वर्चस्व गाजवतात. (भारतीय अर्थव्यवस्थेवरील त्यांचे जबरदस्त नियंत्रण आजही कायम आहे). तरीही जातीच्या हिंसाचाराचे एक तात्विक रूप देखील आहे. प्रदूषित आणि शुद्धतेच्या संकल्पनेतून मध्यस्थी करणारी ही एक श्रेणीबद्धपणे सुव्यवस्थित अशी व्यवस्था आहे, ज्यामध्ये प्रत्येक शिडीवरील लोक त्यांच्या खालील लोकांकडे तिरस्काराने तरी पाहतात किंवा त्यांना खाली तरी खेचतात.

जातीच्या शिडीच्या अगदी तळाशी असलेल्या प्रदूषित देहांना समाजातून अक्षरशः “बहिष्कृत” करण्यात आले. मंदिरांसारख्या पवित्र ठिकाणी प्रवेश करण्यास प्रतिबंध केला गेला, राजकीय आणि सांस्कृतिक विचारविनिमयांपासून दूर ठेवले गेले आणि इतकेच काय तर धार्मिक स्मशानभूमीही त्यांच्यासाठी निषिध्द करण्यात आली. अत्यंत अमानवी पद्धतीने त्यांना कलंकित केले गेले; हिंदूंचा असा विश्वास आहे की विविध प्रकारच्या अशुद्धतेचे ते वाहक आहेत.

अत्यंत जहाल प्रकरणांत, दलिताची सावली, थुंकी आणि नजर हे सर्व अपवित्र मानले गेले. या अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करणार्या दलिताला हिंदूंच्या हिंसेला सामोरे जावे लागले, आजही जावे लागते. ते राज्यातील बिगर नेमलेले पोलिस म्हणून काम करतात जे स्थानिक कामकाज त्यांच्या परंपरेनुसार चालते आहे की नाही याची खाप पंचायत वा अनधिकृत ग्रामपरिषदांच्या माध्यमातून खातरजमा करतात. वैयक्तिक प्रकरणात त्यांच्या मताला राज्य संस्थांपेक्षा जास्त प्राधान्य असते. त्यांच्या कृपेने दलिताच्या शरीरावर हिंसेच्या वर्णाचे कायमस्वरूपी वास्तव असते.

स्त्रियांवरील अत्याचाराच्या भक्कम आधारावर जातीसंस्थेची पायाभरणी झालेली आहे. स्कॉलर उमा चक्रवर्ती ज्याला “ब्राह्मणवादी पुरूषत्व” असे संबोधतात. या सामाजिक व्यवस्थेचा उदय उपखंडातील आर्य आक्रमणाच्या सुमारास झाला, ज्याची परिणिती “इंडिजीनस” लोकांवरील गुलामगिरी आणि वर्चस्व यातून सिद्ध झाली. कालांतराने येथील स्त्री आणि पुरूष यांचे “खालच्या जाती” समुदयांमध्ये रूपांतर झाले तर आर्य उच्च जातीय बनले. प्राचीन संस्कृत ग्रंथ, ऋग्वेदात, चक्रवर्ती यांना लैंगिकतेच्या आधारावरील गुलामीचे दाखले मिळाले, ज्यामध्ये वेगवेगळ्या जातींतील स्त्रियांना वेगवेगळ्या कामाच्या भूमिकांचे वाटप केले होते.

शीर्षस्थानी असलेल्या—ब्राह्मण स्त्रिया उच्च जातीचे वारस पुनरुत्पादित करण्यासाठीच अस्तित्वात असतात. या रितीने वर्चस्वाच्या वर्गीकरणात आर्य ब्राम्हण स्त्रियांना विशेष स्थान मिळाले . त्यांनी मग गुलाम व गुरांवर राज्य केले. गुलाम हे बहिष्कृत जातीतील बंदी असलेल्या स्वदेशी जमाती होत्या. दुसरीकडे हलक्या दर्जाच्या कुठल्याही कामाशी संबध येणार्या खालच्या जातीच्या स्त्रिया अशुद्धतेच्या स्त्रोत मानल्या जात होत्या. अशा परिस्थितीत उच्च-जातीचे पुरुष खालच्या जातीतील स्त्रीयांशी विवाहाच्या संभाव्यतेने घाबरून जायचे कारण आंतरजातीय लैंगिक संबंधामुळे जातीची शुद्धता नष्ट होण्याची शक्यता होती. या भीतीपोटी त्यांनी शुद्रांना उच्च जातीयांशी विवाह करण्यास प्रतिबंधित करणार्या धार्मिक कायद्याची अंमलबजावणी केली.

येथे हे असे सुचवायचे नाही की त्याकाळी कोणतेही आंतरजातीय संभोग व्हायचे नाही. याउलट, प्रत्येक जातीतील स्त्रिया नि:संशयपणे ब्राह्मण पुरुषांच्या आवाक्यात होत्या. फक्त इतकेच की अशा प्रकारचा मिलाप जो अनेकदा बलात्कारात परावर्तित व्हायचा, तो कधीही विवाहापर्यंत पोहचायचा नाही. अत्यंत गंभीर प्रकरणे तर ती होती जिथे एका प्रकारच्या सरंजामी व्यवस्थेत उच्चजातीय मालक खालच्या जातीतील स्त्रियांवर बलात्कार करायचे आणि आपल्या भविष्यासाठी गुलामाचीही निर्मिती करायचे. खरे तर बाराव्या शतकापर्यंत दलित नवऱ्या स्त्रीला आपल्या कायदेशीर पतीबरोबर शारीरिक संबंध निर्माण करण्याआधीच उच्च जातीय जमीनदारांच्या बलात्कारालाही सामोरे जावे लागत असे. एका दलित स्त्रीचा बलात्कार म्हणजे तिच्या कुटुंबाच्या मानसन्मानावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासारखे होते. अशा प्रकारे मालक आपल्या गुलामाच्या कुटुंबाच्या विवेकावर नियंत्रित मिळवायचा. तो पुरुष आपला मान गमावून बसे कारण त्याच्या बाईला दुसर्याकुणीतरी बाटलेले असे. त्याचा राग शांत करून मालक परत परत पीडिताच्या शरीरावर नवं नव्या अत्याचाराची झोड उठवत असे- जे त्याच्या शोषणाचा स्थायी स्तंभ बनत असे. सखोलपणे पाहता, जाती स्त्रियांच्या शरीराच्या आत आणि वर रेलून उभी आहे. जातीचा अंमल खरेतर दुसऱ्याच्या शरीरावरच पोसला जातो.

जरी भारतीय समाज मागील हजारो वर्षांमध्ये कमालीचा बदलेला असला आणि जरी कुठल्याही प्रकारचा “जातीयवाद” राज्यघटनेने निषिद्ध केला असला तरी, ही अत्यंत धक्कादायक आणि निराशाजनक बाब आहे की देशाची संस्कृती आणि राजकीय संरचना आजही परंपरागत जातीय सीमेच्या बंधनात अडकलेली आहे. पश्चिमेच्या गुजरात राज्यातील एक दलित संघटना नवसर्जन, यांच्या 2010 च्या अहवालानुसार तेथे केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की 98.4 टक्के गावांमध्ये आंतरजातीय विवाहांना मनाई आहे. हे 1954 चा स्पेशल विवाह कायदा आणि भारत सरकारने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी असा विवाह केलेल्या जोडप्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मोबदल्याच्या तरतुदींच्या विरोधतात आहे. नॅशनल कौन्सिल फॉर एप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) आणि मेरीलँड युनिव्हर्सिटी यांच्याकडून करण्यात आलेल्या भारतीय मानव विकास सर्वेक्षणानुसार भारतातील शहरी आणि ग्रामीण भागात केवळ 5 टक्के विवाह हे आंतरजातीय म्हणून गणले जाऊ शकतात. यामध्ये पोटजातींमधील विवाहांचा देखील अंतर्भाव आहे. त्याच सर्वेक्षणात असे आढळून आले की ग्रामीण भागातील 30 टक्के आणि शहरी भागातील 20 टक्के भारतीय लोक आजही अस्पृश्यतेचे पालन करतात. आजही बरीच गावे जातीय वरिष्ठांनी चालवलेल्या अनधिकृत ग्रामपरिषदांच्या (खाप पंचायत म्हणूनही ओळखल्या जातात) मर्जीनुसार काम करतात आणि वैयक्तिक खटल्यांमध्ये राज्य संस्थांपेक्षा त्यांचेच वर्चस्व अधिक आहे. आणि म्हणून हे सांगण्याची गरज नाही की दलित वधूंना जातीच्या काटेरी कुंपणाच्या आड अद्याप स्वायत्तता सापडलेली नाही.

या बर्बरपणाच्या दरम्यानच, काही शोकांतिक विनोदाचे क्षणही येतात. जसे की ही अलीकडील घटना, ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील हिंदू-फ़ॅसिस्टवादी भारतीय जनता पक्षाच्या राज्य विधानसभेचे ब्राह्मण सदस्य राजेश मिश्रा यांची चोवीस वर्षांची मुलगी साक्षी मिश्रा दलित असलेल्या एकोणतीस वर्षीय अजितेश कुमारच्या प्रेमात पडली. या नात्याविषयी कळताच साक्षीच्या वडिलांनी जाहीरपणे त्याचा निषेध केला आणि प्रदेशातील संपूर्ण मिश्रा जातीच्या कुळातील लोकांचे समर्थनही मिळवले. इतकेच काय तर आपल्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन वर अजितेशला संपवण्यासाठी त्यांनी गुंडे पाठवले.

मात्र त्याचवेळी हिंमत दाखवत साक्षी आणि अजितेश दोघेही तेथून पळून गेले आणि पोलिस संरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. ज्या गाडीतून ते निघाले त्याच्या मागील सीटवर बसलेल्या साक्षीने व्हिडिओमध्ये, “मला आनंदी व मुक्त जीवन जगायचे आहे” असे जाहीर केले, जे लगेच व्हायरल झाले. तसेच अजितेशच्या कुटुंबाचा बचाव करत आपल्या धर्मांध वडिलांना तिने संबोधून म्हटले: “ती माणसं आहेत, जनावर नाहीत. तुम्हाला तुमची मानसिकता बदलायला हवी. ती चांगली लोकं आहेत. मी त्यांच्याबरोबर खुश राहीन.” एका ब्राम्हण स्त्रीच्या सेक्शुयालिटीशी जोडल्या गेल्याच्या या दलिताच्या उद्धटपणाने जातीयवादी समाजाचा रोष ओढवून घेतला. ब्राह्मण स्त्रियांचे पवित्र स्थान, ज्याला जणू काही कायम संरक्षणाची आवश्यकता असते, ते त्यांच्या प्रतिष्ठेचे मानक असते. त्या प्रतिष्ठेचे हरण केलेल्या अजितेशने एक प्राणघातक चूक केली आहे आणि म्हणूनच त्याच्याबरोबर ती तरुणीही मरणास पात्र आहे.

हे असे विरोधाभास प्रतिबद्ध असलेल्या अशा नात्यांमध्ये आढळून येतात जिथे प्रत्येकाने मरेपर्यंत एकाच व्यक्तीशी एकनिष्ठ राहण्याची अपेक्षा केली जाते आणि त्यातही पुढील सात जन्मं देखील एकत्र राहण्याची ऑफर असते. सहप्रवासात उतार-चढाव स्वाभाविक असताना त्याकरता जोडप्यातील एकामध्ये दोष शोधणारा दृष्टिकोन असतो. भारतात जातीने बंदिस्त केलेल्या समाजात घटस्फोटित महिलांकडे त्यांच्या परिवारासह इतर लोक (स्त्री आणि पुरुष दोन्हींकडून) रोषाने पाहिले जाते. तिची स्वायत्तता भारतातील त्या आदर्श मूल्यांना हानी पोहचवते ज्याच्या इतिहासात पतीच्या चितेवर विधवा स्त्रीला जाळले जायचे (सती प्रथा) किंवा मुंडन करून तिला कुरूप बनवले जात. बी.आर. आंबेडकर यांनी 1916 मध्ये मानववंशशात्राच्या एका पेपरात “भारतातील जाती” मध्ये असे म्हटले आहे की ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये “अतिरिक्त स्त्रियांना” जन्म दिला जातो ज्या कोणत्याही वैवाहिक संबंधातील नाहीत किंवा विधवा आहेत आणि ज्या जातीयवादी समाजाला धोका आहेत. म्हणूनच त्यांना निर्वासित केले जाते- समाजात त्यांना अस्पृश्यतेचा मान दिला जातो.

जाति
© Pragun Agarwal

सभ्यतेविरोधातील युद्ध

आधुनिक भारतात जर कोणतीही सामाजिक प्रगती झाली असेल तर ते दलित आणि कनिष्ठ जातीच्या नेत्यांच्या अविश्रांत प्रयत्नांमुळे झाली आहे. ज्यांनी नेहमीच स्त्रीमुक्तीच्या कार्याला वाहून घेतले. (त्या अनुषंगाने बहुतेक वेळेस ते “परंपरे” च्या नावाखाली हिंदू धर्मांधपणाचे जतन करणार्या तथाकथित राष्ट्रवादी चळवळीच्या उच्च-जातीय नेत्यांच्या विरोधात उभे राहिले.) एकोणिसाव्या शतकातील खालच्या जातीच्या सुधारकांपैकी महाराष्ट्रातील ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले हेच बहुधा आज बहुचर्चित आहेत. पुस्तिक छापणारे आणि सक्रिय कार्यकर्ते असलेले तसेच थॉमस पेनला आपला नायक म्हणवून घेणारे जोतिबा हे हिंदू ब्राह्मणवादी कट्टरपंथाचे एक खंबीर व अग्रणी समीक्षक होते. आपल्या पत्नीबरोबर त्यांनी स्त्री-शिक्षण क्षेत्रात विलक्षण कार्य केले. हिंदू धर्मांध त्याकाळी कट्टरपणे विरोध करत असताना मुली आणि अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी सर्वप्रथम शाळा स्थापन केल्या तसेच ब्राम्हण स्त्रियांच्या विवाहबाह्य जन्मलेल्या मुलांसाठी अनाथालय उघडले. (रूढीवादी लोकांच्या भीतीपोटी सोडून दिलेली किंवा मारून टाकलेली अशी अनेक मुलं तिथे असायची.) ते विधवा पुनर्विवाहाचे देखिल पुरस्कर्ते होते.

पुढच्या पिढीतील, ब्राह्मणविरोधी “स्वाभिमान” चळवळीचे संस्थापक मानले जाणारे दक्षिण भारतीय विचारवंत “पेरियार” ई.व्ही. रामास्वामी नाईकर हे देखिल महिलांच्या हक्कांचे खंबीर पुरस्कर्ते होते. पाठोपाठ एकानंतर एक पुस्तकांमधून त्यांनी ब्राह्मणवादी ग्रंथांच्या अतार्किक गोष्टींशी युक्तिवाद केला व इतर गोष्टींबरोबरच याही गोष्टींचे समर्थन केले की स्त्रियांना त्यांचे जोडीदार निवडण्याचे, त्यांना हवे तेव्हा घटस्फोट घेण्याचे आणि गर्भनिरोधक वापरण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे जेणेकरून त्यांना मुलं आणि संसार या पलीकडील जीवन जगायला मिळेल, पेरियार यांचे पहिले पुस्तक खरेतर जन्म नियंत्रणावर होते. त्यांनी गर्भधारणेकडे एक दुर्दैवी घटना म्हणून पाहिली ज्यामुळे महिलांना “स्वतंत्र जीवन जगण्यापासून” प्रतिबंधित केले जाते.

जातीची शिडीवरील सर्वात खाली असणाऱ्यांच्या प्रदूषित अस्तित्वाला समाजातून अक्षरशः “बहिष्कृत”केले गेले-त्यांना मंदिरांसारख्या पवित्र मानल्या जाणाऱ्या जागी प्रवेश करण्यापासून रोखले गेले.

पेरियार यांची ब्राह्मणवादी पितृसत्तेवरील टीका ही संघटित राजकारणा पर्यंत विस्तारली. कुटुंब नियोजनाचे कट्टर समर्थक असलेल्या त्यांनी त्याकडे पुराणमतवादी धर्म आणि चालीरितींवरील उत्तम उपाय म्हणून पाहिले. त्यांनी बाल संगोपन आणि स्वयंपाकाच्या बोजाला सामोरे जाण्यासाठी समाजिक स्वयंपाक आणि बाल-देखभाल केंद्रे स्थापन करावी असा प्रस्ताव दिला. कट्टर आधुनिकतावादी असणाऱ्या त्यांनी पुराणमतवादी विरोधाला तोंड देऊन कौटुंबिक नियोजनाला प्रोत्साहन देणाऱ्या पाश्चिमात्य देशांकडे लक्ष वेधले. “जर पालक अधिकाधिक मुलांना जन्म देऊ लागले तर त्यांच्या सुखसोयी आणि सुविधांमध्ये घट होते” असे त्यांनी लिहिले आहे. “त्याचप्रमाणे, लोकसंख्या वाढत गेली तर देशाला दुष्काळ, दारिद्र्य आणि सामान्य जीवनासाठी आवश्यक गोष्टींच्या टंचाईचा सामना करावा लागेल.” मूलभूतपणे, मोठी कुटुंबे कल्याणकारी राज्याच्या निर्मितीमध्ये अडसर निर्माण करतात. (एकेठिकाणी त्यांनी अधिकच कठोरपणे असे सांगितले आहे की लहान मुलं सार्वजनिक जीवनासाठी डोकेदुखी असतात.) पेरियारचा कट्टर पुरोगामीपणा पुढे बहुपतिकत्वाचे समर्थन करण्यापर्यंत येऊन ठेपला कारण त्यांनी पाहिले की विवाह आणि शुद्धता ही मुख्यतः पुरुषप्रधान, स्त्री-विरोधी संस्था आहेत. त्यांच्या सेक्सीझम प्रति असलेल्या द्वेषाची बरोबरी केवळ जातीबद्दलच्या द्वेषाशीच होऊ शकली असती.

पण तरी देखील ब्राह्मणवादी पितृसत्ताकतेच्या मुळावर हल्ला करणाऱ्यांमध्ये भारतातील सर्वात आधुनिक बुद्धीजिवी आणि राजनीतिज्ञ बी.आर. आंबेडकर पुढे होते. आंबेडकर हे ख्यातमान व्यक्तित्व आहे. मुंबई प्रदेशातील पहिले अस्पृश्य महाविद्यालयीन पदवीधर, आणि त्यांच्या जातीतले सर्वप्रथम ज्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले—तेही कोलंबिया विद्यापीठातून. दलित चळवळीचे ते जनक तर आहेतच पण कदाचित आज भारतातील सर्वात प्रतिष्ठित बुद्धीजीवी देखिल आहेत. ते एक बहुश्रुत (पोलीमॅथ) आणि बहुभाषी होते ज्यांनी मानववंशशास्त्र, समाजशास्त्र,अर्थशास्त्र,धर्मशास्त्र ते फ्रेंच इतिहास आणि इंग्रजी साहित्य यांसारख्या अफाट विषयांचा अभ्यास केला (कोलंबियामधील काही वर्षांत त्यांनी एकुण 60 कोर्सेस पूर्ण केले). 1915 मध्ये कोलंबिया विद्यापीठातून एम.ए. पूर्ण केल्यानंतर (जिथे त्यांना प्रख्यात विचारवंत जॉन ड्युई यांच्या अंतर्गत शिकता आले), 1916 मध्ये त्यांनी LSE मधून डी.फिल प्राप्त केले आणि 1928 मध्ये दुसरी डॉक्टरेट मिळवण्यासाठी ते कोलंबियाला परतले. या कार्यकाळानंतर ते भारतात परतले व अशा राजकीय कारकीर्दीला सुरवात केली ज्याने देशाचा चेहरा बदलला.

अथकपणे दलितांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळींना हरतऱ्हेने साहाय्य –  वृत्तपत्रांचे संपादन करून, कामगारांचे संगठन करून, नव्या पक्षांची स्थापना करून, निवडणुका लढवून त्यांनी केवळ पुढे नेले आणि सावरलेच नाही तर स्वतंत्र भारताचा मसुदाही लिहिला. हे सर्व करत असतानाच प्रत्येक रात्री गहन संशोधन करून पुस्तकावर पुस्तके लिहिली (उल्लेखनीय म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत जातीयवाद्यांकडून होणाऱ्या हल्यांपासून बचाव करत हे सर्व केले).

आंबेडकरांनी त्यांच्या राजकीय कार्यात स्त्रियांच्या प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केले. 1928 मध्ये, त्यांनी मुंबई विधानसभेत महिलांना प्रसूती रजा मान्य करणाऱ्या बिलाचे जोरदार समर्थन केले. 1938 मध्ये त्यांचे सहकारी पी.जे. रोहम यांनी त्यांच्यावतीने बॉम्बे प्रांतीय विधानसभेमध्ये जन्म नियंत्रणाची वकिली करणारे बिल सादर केले, दुर्दैवाने हे बिल पराभूत झाले. आंबेडकरांचा असा विश्वास होता की पुनरुत्पादनाचा अधिकार फक्त स्त्रियांकडे असायला हवा. 1930 ते 1940 च्या दशकात त्यांनी महिला मुक्ती संदर्भातील विविध बिलांसाठी लढा दिला जो पुराणमतवादी राजकारण्यांनी हाणून पाडला. पण कदाचित त्यांचा सर्वात मोठा दुःखद वारसा हा हिंदू कोड बिल होता, जिचा मसुदा त्यांनी तयार केला व 1951 मध्ये संसदेत सादर केला. हिंदू स्त्रियांना विवाह, घटस्फोट, दत्तक आणि मालमत्ता इत्यादी बाबतीत बरोबरीचा अधिकार देऊन त्यांनी हिंदू स्त्रियांच्या अत्याचाराच्या सर्व संरचनांना मोडून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र झालं हे की संसदेच्या आतील आणि बाहेरील प्रतिगामी दलांनी या बिलला विरोध केला, ज्याची परिणीती आंबेडकरांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा देण्यात झाली. (बऱ्याच वर्षांनी या बिलाची अतिशय निकृष्ट आवृत्ती पास केली गेली.)

आंबेडकरांची जातीची संकल्पना ही जातीव्यवस्थेच्या प्राथमिक एजंट असणाऱ्या स्त्रियांच्या दु: खाच्या आकलनावर आधारित होती. ज्यामुळे ते आजवर आधुनिक विचारक मानले जातात. त्यांनी असे पहिले की जाती-आधारित लिंगाशी संबंधित असलेले कर्मकांडच हिंदू ब्राह्मणी व्यवस्थेला जिवंत ठेवते. सुनियोजित आचारसंहिता स्त्रियांच्या अधिकाराबाहेरील होती कारण स्त्रिया आध्यात्मिक प्राप्तीसाठी असमर्थ मानल्या गेल्या. 12 डिसेंबर 1938 रोजी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या परिषदेला संबोधित करताना त्यांनी शिक्षण, रोजगार,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वैवाहिक संबंधातील लिंग समतेचे महत्त्व विशद केले. त्यावेळी ते म्हणाले “मी अनेक सुंदर मुलींना कुरूप माणसांच्या हाती सुपूर्त करताना पहिले आहे.”

“मी या देशाने थकलो आहे . . . त्याचा धर्म, सामाजिक व्यवस्था, सुधारणा आणि संस्कृती या सर्वांनी मी अतिशय थकलोय. माझे एका सभ्यतेसह युद्ध आहे.” एक दशक आधी, 1927 मध्ये, त्यांनी मनुस्मृती, एक असा प्राचीन हिंदू ग्रंथ ज्यामध्ये सर्वात खालच्या स्तरातील स्त्रीद्वेषाला नियमबद्ध केलं आहे, त्याच्या सार्वजनिक दहनाचे आयोजन केले होते. (तिसऱ्या अध्यायाच्या आठव्या खंडात कोणत्या प्रकारच्या स्त्रियांना त्याज्य करावे याची एक यादी देण्यात आली आहे: जिच्या शरीरावर विरळ किंवा मग खूप केस असणारी, खूप बडबड करणारी, अगदी गरम डोक्याची.) तर या महापुरुषांच्या यादीमध्ये जाती विरोधी संघर्ष केलेल्या दलित स्त्रियांना आपण दुर्लक्षित करू नये. विदुषी मीनाक्षी मून आणि उर्मिला पवार यांनी आपल्या एक उत्कृष्ट पुस्तकात आम्ही इतिहास घडविला (1989) मध्ये आंबेडकरी आंदोलनापूर्वी आणि त्यानंतर अशा दोन्ही काळात दलित महिलांच्या स्त्रीवादी कामगिरीच्या समृद्ध इतिहासावर अभिलेखी साहित्य आणि इथनोग्राफिक (मानवशास्त्रीय) तपशीलांसह सखोल अभ्यास केला आहे.

लग्नसंस्थेतील विदाह

जातीभेदाविरूद्ध लढा हा खरेतर भारतातील मध्यवर्ती स्त्रीवादी लढाई आहे. कारण आपण पाहिले आहे की, ब्राह्मणवादी विवाह स्त्रियांचे पतन करतात. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे घटस्फोट हे असे पाप मानले जाते जे स्त्रियांच्या चारित्र्यावर “कलंक” लावते (पुरुषावर नव्हे). पुष्कळदा स्त्रिया अशा पुरुषांकडून केलेली क्रूरता व अत्याचार सहन करतात, जे आपल्या भव्य सामर्थ्याबद्दल जाणून असतात आणि म्हणून स्त्रीवर नियंत्रण मिळवून त्यांचा फायदा कसा उठवायचा, हे त्यांना चांगलेच ठाऊक असते.

या सगळ्यात प्रेम मार्ग दाखवू शकेल काय? सत्य हे आहे की “आंतरजातीय” किंवा प्रेम विवाह भारतात अजूनही आकर्षक तरी निंदनीय असे विषय आहेत. प्रेमापोटी लग्न करणारी जोडपी कुतूहलाचा विषय असतात. त्यांनी कसं काय जमवलं? का? कशासारखे असते हे? मी आधी सांगितल्याप्रमाणे सिनेमात जातीधारित प्रेमाचे वर्णन टाळले जाते त्यामुळे संदर्भा खातीर केवळ काही उदाहरणे देता आली.

हे खरं आहे की प्रेम विवाह निखालस भावनांवर आधारित असतात, कुठलाही वारसाहक्क किंवा शुद्ध डीएनए मिळवण्याची मनिषा त्यात नसते. तरीही आपण त्यास आदर्श बनवू नये किंवा रातोरात त्यामुळे भारतातील परिस्थिती बदलेल अशी कल्पना करू नये. अखेर, हिंदू धर्माचे विष भारतीय समाजात खूप खोलवर पसरले आहे. जरी ब्राह्मणवादी पितृसत्तेची रचना ढासळत असली (जसे ते हळू हळू होत आहे), तरी विशेषत: प्रेमाशी संबंधित हिंदू मानसिकता बदलण्यासाठी अजून बराच संघर्ष करावा लागणार आहे. सध्याच्या हिंदूकृत विचारधारेनुसार वैवाहिक प्रेमसंबंध हताश करणारे आणि अविश्वासू समजले जातात. शंका आणि एखाद्याच्या बंडखोर इच्छेच्या उत्कटतेमुळे त्यात मानसिक आणि शारीरिक हिंसाचार होतो.

भारतीयांमध्ये जोरू का गुलाम किंवा बायकोचा गुलाम हा अगदी सहज वापरला जाणारा एक वाक्प्रचार आहे. हा सहसा अशा पुरुषांकरिता वापरला जातो जे आपल्या बायकोप्रती एकनिष्ठ असतात. अशा पुरुषांची थट्टा केली जाते जे आपल्या जोडीदाराची सार्वजनिकरित्या प्रशंसा करतात. जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्याला कमजोरी किंवा अधीनतेचे लक्षण म्हणून बघितले जाते. हा पुरुषप्रधान वारसा आहे की जिथे समाजाच्या कठोरतेचा सामना केल्यावर सौम्य मनाच्या मुलाचे उग्र, उद्धट पुरुषात रूपांतर होते जिथे समाज त्याच्यात एक आदर्श असल्याचे दर्शवितो. विवाह खरेतर वैयक्तिक मूलतत्वापलीकडे पालकांचेच लग्न अधिक होते. लग्नसमारंभात, पालक मुलांच्या भविष्याबद्दल एकाचवेळी तणावग्रस्त तसेच आनंदी असतात हे कुठलीही व्यक्ती सहजपणे स्पॉट करू शकते.

आपल्या पत्नीचे सार्वजनिकरित्या कौतुक करणाऱ्या पुरुषांची चेष्टा केली जाते. पत्नीप्रति असणारे प्रेम हे कमजोरी किंवा अधीनतेचे लक्षण मानले जाते.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारतात लग्नाचे सरासरी वय अंदाजे बावीस आहे तर अनेक विकसित देशांमध्ये ते सुमारे तीस वर्षे आहे. इतक्या लवकर कौटुंबिक संस्कृतीला सुरवात करणे हा येथील सर्वसामान्य कायदा आहे आणि संसारात तुम्ही मुलांची पैदास करण्यासाठीच आला आहेत अशी सर्वसाधारण धारणा असते. आणि त्यात मुलाला (पुरुष) जन्म देणे म्हणजे तर सफलतेची पराकाष्ठा मानली जाते. भारतासारख्या पीडित समाजात अविवाहित व्यक्तीला आजार म्हणून पाहिले जाते. इथल्या वडिलधार्या लोकांना हेट्रोसेक्श्युल (आणि, अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये समलैंगिक) नात्यांमधील जोडीदाराबरोबरचे जीवनच “नैसर्गिक” आहे असे वाटते. एका विशिष्ट वयात पोहचलेल्या अविवाहित व्यक्तीकडे आर्थिकदृष्टिकोनातून शंकेने बघितले जाते. रीतीरिवाजाच्या रामरगड्यात धावणाऱ्या आयुष्याच्या उपर कोण स्वतःच्या मन मर्जीचे आयुष्य निवडेल?

भांडवलशाहीने ही समस्या अधिक गुंतागुंतीची बनवली आहे. पुनरुत्पादनाची कल्पना कर्जाच्या उद्योगास अनुकूल आहे. ज्यामुळे जीवनशैलीमध्ये बदल झालेला आहे आणि जिच्यावर भांडवलशाहीचे परिपूर्ण नियंत्रण आहे. आपल्या इच्छा आणि स्वप्नांना बँकांच्या   नियमावलीमध्ये गुंतवून बचत मॉडेलशी सांगड घालावी लागते. बर्‍याच वेळा आपण कर्ज दस्तावेजाच्या धाकातूनच स्वप्न पाहतो. शोषक कॉर्पोरेट उद्योग हे ठरविते की आपण काय स्वप्न पहावे आणि किती स्वप्ने पाहावीत. बहुतेक वेळा (वैवाहिक) भागीदारी बाजाराच्या नियमांनी वेढलेली असते. एखाद्याच्या बटव्याच्या क्षमतेनुसार कोणी थांबते तर कोणी सोडून जाते. नोकरीच्या सुरक्षिततेची अनिश्चितता आणि कर्जाचे ओझे एकटे पुढे जाण्याची शिफारस करत नाहीत, आणि त्यामुळे गरज असते एका साथीदाराची – एकटेपणा आणि दुःखे वाटण्याची.

निर्व्याज्य प्रेम आणि आनंद

भारतात कितीतरी वाईट गोष्टी घडून गेल्या आहेत, मात्र तिथल्या बंडखोर तरूणांची ऊर्जा आमूलाग्र बदलांची मागणी करते. तरुण मंडळी – किमान त्यांच्यापैकी काही जण अद्याप हिंदू समाजाच्या पूर्वग्रहांमुळे प्रभावित झाले नाहीत आणि हे मूलगामी ऊर्जेचे संभाव्य स्त्रोत आहेत. भारतीय तरूणांनी प्रेम हा एक गहिरा अनुभव आहे तर आनंदाच्या गावी नेणारा एकतर्फी मार्ग नाही हे जाणून स्वच्छंदी प्रेमाचा स्विकार करावा. वैवाहिक जीवनाच्या संदर्भात, आपल्याला एका विवाह घोषणापत्राची आवश्यकता आहे – ज्यामध्ये लग्नानंतरच्या सुविधांचा जाहिरनामा असेल. महिला आणि पुरुषांनी त्यांच्या गंभीर समस्यांविषयी मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे.

समलिंगी विवाहांमध्ये नव-नवीन संस्करणे धुंडाळली जाऊ शकतात तर हेट्रोसेक्श्युल घोषणापत्रांत स्त्रियांनी त्यांच्या गरजा, आकांक्षा, तिच्या सेक्श्युल पसंती तसेच बदलणार्या मनोवस्था आणि बदलत्या भूमिका यांना हाताळता येणार्या अनेक मार्गांचा आढावा घ्यावा. याचे अनुसरण पुरूषांनी देखिल केले पाहिजे. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की प्रेम हे आवाक्यात असणारे हवे तर स्वप्नांच्या दुनियेतील अप्राप्य कसरत नसावी.

पंधराव्या शतकातील द्रष्टे-कवी कबीर हे भारतातील महान जातविरोधी विचारवंतांपैकी एक आहेत. कबिराची गाणी या आपल्या पुस्तकात ओशोंनी सांगितले आहे: “जर तुम्हाला खरोखरच एखाद्या स्त्रीवर प्रेम करायेचे असेल तर कधीही तिच्याशी लग्न करू नका. तसेच जर तुम्हाला खरोखरच एखाद्या पुरुषावर प्रेमाची पखरण करायची असेल तर त्याच्यापासून शक्य तितके लांब जा, म्हणजे चिर:काल तुम्ही फक्त प्रेम करू शकाल. प्रेमप्रकरण उद्धवस्त करायचे असेल तर लग्न करा.” इतरत्र आपल्या हलक्या फुलक्या अंदाजात कबीर असे म्हणतात की: “प्रेमाचे घर उंच आणि एकाकी आहे.” म्हणूनच, “प्रेम टिकविणे कठीण आहे, सर्वजण ते टिकवून ठेवू शकत नाहीत.” विवाह म्हणूनच अपरिपक्वतेचे लक्षण आहे.